पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३८ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन मधून करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आगामी महानगर पालिका निवडणूका आणि गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं आहे. हत्या, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, अपहरण, मारामारी अशा गंभीर गुन्हे असलेल्या ३८ सराईत गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. २० ते ४८ वयोगटातील हे गुन्हेगार आहेत. दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आलं. तर, काही जणांना एक वर्षांकरिता तडीपार करण्यात आलं आहे. संघटीत टोळ्यांच्या प्रमुखांचा यात समावेश आहे. ही कारवाई केल्याने पोलिसांचं कौतुक होत आहे. याआधी ही शेकडो जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
तडीपार करण्यात आलेला आरोपी आपल्या परिसरात दिसल्यास तात्काळ पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती द्यावी. अस आवाहन पोलीस उपायुक्त परिमंडळ एक आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, बापू बांगर आणि गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी केलं आहे. दोन्ही परिमंडळातील प्रत्येकी १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे. काही अनुचित प्रकार घडू नये पोलीस नेहमी सतर्क आहेत. अशी माहिती गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली आहे.