पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पती, सासरे, सासू, दीर, नणंदेसह अकरा आरोपींविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात सोमवारी आरोपपत्र दाखल केला. वैष्णवीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून आरोपींविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात दाखल केलेेले आरोपपत्र १६७० पानी आहे. त्यात आरोपींविरुद्ध ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

शारीरिक आणि मानसिक छळामुळे वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग ठोस पुराव्यांसह स्पष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती बावधन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सोमवारी न्यायालायात दिली.

आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी आरोपी प्रीतम पाटील, मोहन ऊर्फ बंडू उत्तमराव भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव, तसेच राहुल दशरथ जाधव यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१), दीर सुशील राजेंद्र हगवणे (सर्व रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, ता. मुळशी), वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून नातेवाइकांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी नीलेश चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) आणि आत्महत्येच्या घटनेनंतर पसार झालेल्या राजेंद्र आणि सुशील हगवणेला आश्रय दिल्याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोनगोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक), मोहन ऊर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय ५९, रा. भेगडे वस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. भांगरवाडी, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५) व राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.