पिंपरी : विद्यार्थ्यांची अवैध आणि धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या बस, इको व्हॅन, रिक्षा चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा दंडुका उगारला. विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील ३२७ वाहनांची तपासणी करून धाेकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या २०५ बस, रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून सात लाख ६९ हजार ७५० रूपये दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी बस, व्हॅन, रिक्षांचा वापर केला जाताे. मात्र, विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही बस चालक नियमांचे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत. काही वेळा वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसविले जाते. धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या वाहतुकीबाबत पिंपरी-चिंचवड पाेलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

नागरिकांच्या तक्रारी नंतर वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या चार वायुवेग पथकामार्फत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसची तपासणी करण्यात आली. पिंपरी, भोसरी, चाकण, वाकड, निगडी आणि हिंजवडी वाहतूक विभागाचे हद्दीमध्ये कारवाई करण्यात आली. १७० बस आणि १५७ व्हॅन आणि रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अवैध आणि धोकादायक पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या ७० बस आणि १२८ व्हॅन, रिक्षांवर कारवाई करण्यात आली. चालकांकडून सात लाख ६९ हजार ७५० रूपये दंड वसूल केल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले.