पिंपरी : भोसरीमधील उजगरे आणि वाकडमधील आहिरराव टोळ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मागील अडीच महिन्यात सहा गुन्हेगारी टोळीतील ३० आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
भोसरीमधील टोळी प्रमुख पवन छगन उजगरे, सुनील जनार्दन सकट (वय ३२), दीपक रामकिसन हजारे (वय २७) या टोळीवर नुकताच शस्त्राच्या धाकाने जबरी चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. या टोळीवर सहा गुन्हे दाखल आहेत. वाकड मधील टोळी प्रमुख आदित्य ऊर्फ निरंजन शाम आहिरराव (वय ३१, रा. तापकीरनगर, काळेवाडी), प्रतीक अशोक माने (वय २०), प्रेम संदीप तरडे (वय १९) या टोळीवर एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा…पुण्यात काँग्रेसमधील वाद मिटेना
दोन्ही टोळी प्रमुखांनी साथीदारांसह अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्यासाठी, गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करून भोसरी, वाकड, सांगवी, चतु:शृंगी, सोलापूर, अहमदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दुखापत, दंगा, मारामारी, बेकायदेशीररीत्या जीवघेणी हत्यारे जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
हेही वाचा…धक्कादायक! पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीची आत्महत्या
आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दोन्ही टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश दिले.