पिंपरी : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. अनेक कंपन्या, शाळा, महाविद्यालयेदेखील बंद होती. पिंपरीगावातून पिंपरी चौकापर्यंत काढलेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेते, महिलांचा लक्षणीय सहभाग होता. जालन्यातील मराठा समाजाचे आंदोलन उधळून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठीहल्ला केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ राज्यात ठिक-ठिकाणी आंदोलने, बंद, मोर्चे काढण्यात येत आहे. याच अनुंषगाने मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक दिली होती. व्यावसायिकांनी उत्स्फुर्तपणे बंद पाळला. शहरातील सर्वात मोठी पिंपरी कॅम्पातील बाजारपेठ देखील बंद होती. अनेक कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये देखील बंद होती.

काही महाविद्यालयांनी परीक्षेचे पेपर पुढे ढकलले. दररोज मोठी वर्दळ असलेल्या रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषंधांची दुकाने, बँका, वाहतूक, पेट्रोल पंप चालू होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी चौकात निषेध आंदोलन सुरू होते. पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पिंपरी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. “एक मराठा लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कोणाच्या बापाचे”, “तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय”, “कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही”, “या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मुस्लिम समाजातील महिला देखील सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा : पिंपरी : चऱ्होली, मोशीत नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव, एमआयडीसीसह २० गावांना लाभ, महावितरणची मान्यता

सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग

मोर्चात, पिंपरीतील आंदोलनात भाजपचे आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, एकनाथ पवार, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मारुती भापकर, काशिनाथ नखाते, नानासाहेब जावळे-पाटील, धनाजी येळकर-पाटील, प्रकाश जाधव आदी सहभागी झाले होते. पक्षाचा नव्हे तर समाजाचा कार्यकर्ता म्हणून आंदोलनाला पाठिंबा असल्याची भूमिका सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मांडली.

हेही वाचा : पुणे : गणेशोत्सव खरेदीसाठी गर्दी; मध्यभागात कोंडी

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या

ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. जातीनिहाय जनगणना करावी. लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. आंदोलकावर आजवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत. निगडीतील भक्ती-शक्ती समुहशिल्पा लगतची साडेतीन एकर जमीन शिवसृष्टी, महापुरुषांच्या जयंती उत्सव, इतर सर्व सार्वजनिक उपक्रमांकरिता कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षणावरुन छावा संघटनेचा इशारा, “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुठल्याच नेत्याला आम्ही ध्वजारोहण…”

भगव्या टोप्या अन्‌ हातात भगवे झेंडे

मोर्चाच्या सुरूवातीलाच मराठा क्रांती मोर्चाचा फलक घेऊन महिला, तरूणी पुढे होत्या. महिला, पुरूष, तरूण-तरूणींनी डोक्‍यावर भगव्या, गांधी टोप्या आणि हातात भगवे झेंडे घेऊन सहभाग घेतला. मोर्चेकरी शिस्तबध्द आणि आरक्षणासंदर्भात घोषणाबाजी करत होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मोर्चा आणि आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. दरम्यान, ‘पक्ष किंवा पुढारी म्हणून नाही तर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आंदोलनाला आलो आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेतही वारंवार आवाज उठविला आहे. आरक्षणासाठी जे-जे करावे लागेल ते करणार आहे’, असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.