पिंपरी : रिक्षातून आलेल्या सहा जणांनी मिळून ‘आम्ही पोलिसांना टीप देतो, तू असे लोकांना का सांगतो’ असे म्हणत तरुणाला शिवीगाळ करून कोयत्याने मारहाण केली. यात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावरही कोयत्याने वार केल्याची घटना मोशीत घडली. या प्रकरणी राहुल आप्पासाहेब लोहार (२७, उरुळी कांचन), आकाश दिनकर गायकवाड (२४, मोशी), ऋतिक प्रकाश गायकवाड (२४, चाकण), गणेश बबन वहिले (२३, डुडूळगाव) यांना अटक केली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र हे दुचाकी घेण्यासाठी थांबले असताना, आरोपी त्यांच्या रिक्षातून आले. एका आरोपीने फिर्यादीच्या मित्राला “आम्ही पोलिसांना टीप देतो, तू असे लोकांना का सांगतो” आणि “मद्यपान करण्यासाठी बोलावले होते, तू का आला नाही” असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी सोडवण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारले. आरोपींनी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सांगवी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून मिरची पावडर, दोन कोयते आणि चार दुचाकी वाहनांसह एकूण दोन लाख ३९ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जुनी सांगवी येथे करण्यात आली.

संतोष मुक्काप्पा पवार (३०, बाणेर), पियुष आनंद राजपुत (१८, औंध), तेजस मनोहर हंसकर (१९, जुनी सांगवी), आलोक सुर्यकांत खेत्रे (औंध), अमोल संजय भोसले (२४, जुनी सांगवी), विराज अधिकराव काटे (२०, औंध अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई विकास माळवी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून जुनी सांगवी येथील एका दुकानावर दरोडा टाकण्याची तयारी करून आले होते. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून दरोडेखोरांचा डाव उधळला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली. तर त्यांचे दोन साथीदार पळून गेले. आरोपींच्या ताब्यात २५ रुपये किमतीची मिरची पावडर, चार दुचाकी, कोयते आणि ३४ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल असा एकूण दोन लाख ३९ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून कोटीची फसवणूक

एका ॲपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के रोज खात्रीशीर नफा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक कोटी ५८ लाख ९ हजार ४३१ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना चिंचवड येथे घडली.

या प्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका ॲप युआरएलच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के रोज खात्रीशीर नफा देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करून, त्यांनी फिर्यादीस वेगवेगळया बँक खात्यांमध्ये एकूण एक कोटी ५८ लाख ९ हजार ४३१ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादीने गुंतवलेल्या रकमेवर ८ कोटी रुपये एवढा मुद्दल व नफा असल्याचे आमिष दाखवले. परंतु, गुंतवणूक केलेली रक्कम व नफा काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फिर्यादीकडे एकूण जमा रकमेच्या २.८२ टक्के चार्जेसची मागणी करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. ही कारवाई नवी सांगवी येथे करण्यात आली.आदित्य ऊर्फ सरकीट सुरेश आचारी (२४, जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई शैलेश मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पीडब्ल्यूडी मैदानात एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आदित्य आचारी याला अटक केली. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीची दोन काडतुसे जप्त केली आहेत. सांगवी पोलीस तपास करत आहेत.