पिंपरी : ‘पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी डॉक्टरांचे योगदान महत्त्वाचे आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे सामूहिक उद्दिष्ट आहे. त्यासाठी डॉक्टरांनी आपल्या रुग्णांपर्यंत ‘तपासणी, स्वच्छता आणि पाणी झाकून ठेवणे’ (चेक, क्लीन, कव्हर) ही त्रिसूत्री रुग्णांपर्यंत पोहोचवावी,’ असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांबाबत खासगी वैद्यकीय क्षेत्र अधिक सजग राहावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए-पीसीबी), पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन (पीसीडीए) आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळापूर्व शिबिर घेण्यात आले. शहरातील तीनशेहून अधिक खासगी डॉक्टर सहभागी झाले होते. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर या वेळी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले, ‘प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे सर्वांचे सामूहिक उद्दिष्ट असून, ते पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे. महापालिकेतर्फे सर्व डॉक्टरांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि साधनसामग्री वेळेवर उपलब्ध करून दिली जाईल. लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी, स्वच्छता आणि पाणी झाकून ठेवणे ही त्रिसूत्री आपल्या रुग्णांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून शहर पातळीवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवता येतील.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. दीपक साळुंखे यांनी डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य व जलजन्य आजारांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. रोगांची लक्षणे, प्रतिबंधक उपाय, क्लिनिक पातळीवर घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी माहिती दिली.