प्रवाशांशिवाय इतरांची गर्दी रोखण्याचे कारण
उन्हाळी सुटीमध्ये स्थानकावर प्रवाशांशिवाय इतरांची गर्दी वाढत असल्याने ती रोखण्याचे कारण देत रेल्वेने पुणे स्थानकावर फलाटाच्या तिकिटात पुन्हा दरवाढ केली आहे. १८ ते ३१ मे या कालावधीत दहा रुपयांचे फलाट तिकीट ३० रुपयांना मिळणार आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना फलाटावर येण्यास आणि प्रवास करण्याची परवानगी नसल्याचे पुणे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
करोनातील निर्बंधांनंतर टप्प्याटप्प्याने गाड्या सुरू करताना पुणे रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी फलाटाच्या तिकिटात दरवाढ करण्यात आली होती. त्या वेळी दहा रुपयांच्या तिकिटाचा दर ५० रुपये करण्यात आला होता. अनेक दिवस हा दर कायम होता. शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणावर लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्यानंतर फलाटाच्या तिकिटाचे दर पुन्हा पूर्ववत करण्यात आले होते.

सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. रेल्वेकडून अतिरिक्त आणि विशेष गाड्याही सोडण्यात आल्या आहे. सध्या उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी आहे. प्रत्यक्ष प्रवाशांशिवाय इतरांची गर्दी स्थानकावर वाढत असल्याचे कारण देत रेल्वेने पुन्हा फलाटाच्या तिकिटात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ ते ३१ मेपर्यंत ही दरवाढ लागू राहणार असल्याचे पुणे रेल्वेकडून कळिवण्यात आले आहे. कन्फर्म झालेले तिकीट किंवा आरएसी तिकीट असणाऱ्यांनाच फलाटावर प्रवेश करण्याची आणि प्रवासाची परवानगी आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना अशी परवानगी नाही. त्यामुळे या प्रवाशांनी स्थानकावर गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.