पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६ तारखेला म्हणजेच रविवारी पुणे दौर्‍यावर येत आहे. त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण यांच्यासह विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर म्हणजे जवळपास ५० वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेला भेट देणारे दुसरे पंतप्रधान ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुरुडकर झेंडेवाले यांना आकर्षक असा फेटा तयार करण्यास सांगितला. त्यानंतर गिरीश मुरुडकर यांनी तब्बल ८ दिवस मेहनत घेऊन ‘शाही फेटा’ तयार केला आहे.

या बाबत अधिक माहिती देत गिरीश मुरुडकर म्हणाले की, “पुणे महापालिकेत ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यामुळे आम्ही फेटा देखील ऐतिहासिक स्वरूपाचा असावा, यासाठी आम्ही फेट्याचे जवळपास २५ पॅटर्न पाहिले. त्यानंतर पंतप्रधान मोदी कोणत्या पद्धतीचे कपडे घालणार याचा विचार करत मॅच होणारा फेटा बनवण्याचं ठरवलं. त्यानुसार, आम्ही क्रीम विथ रेड कापडचा वापर केला आहे. यासाठी पैठणीचे कापड, जरी आणि ऑस्ट्रेलियन डायमंड असे साहित्य वापरले आहेत. फेट्याच्या वरील बाजूस गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिलंय. तर, त्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलामध्ये शिवमुद्रा बसविण्यात आली आहे. सूर्यफुलाचं वैशिष्टय असं की, ते नेहमी तेजाकडे, सूर्याकडे पाहत असते,” अशीच थीम घेऊन फेटा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

म्हणून फेट्याच्या मध्यभागी बसवली जाळी

पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा त्यांना शाही फेटा घातला जाणार आहे. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने, फेटा म्हटल्यावर गरम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वजनाने हलका बनविला असून त्यासाठी रेशमी आणि कॉटनचे कपड वापरले आहे. फेट्यामधून हवा आत-बाहेर जावी, त्यांना त्रास होता कामा नये, यासाठी मध्यभागात जाळी तयार केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

मुरुडक झेंडेवाल्यांचा फेटे बनवण्याचा इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले तीन पिढ्यापासून झेंडे, फेटे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मुरुडकर यांच्याकडून देश विदेशातून झेंडे आणि फेट्यांना विशेष मागणी असते. त्यांनी आजपर्यंत दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह राजकीय क्षेत्रासह कला आणि क्रिडा क्षेत्रातील मंडळींसाठी आकर्षक असे फेटे तयार केले आहेत. आता त्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शाही फेटा तयार केला आहे.