पुणे : शहरातील रस्त्यांवर होणारी अतिक्रमणे, जागोजागी पडलेले खड्डे, तुंबलेली गटारे यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांनी आता थेट रस्त्यांवर उतरण्याचा आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. काही ठिकाणी महापालिका आयुक्त हे स्वत: भेट देणार आहेत. या पद्धतीने कामकाज करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यामध्ये पथ, अतिक्रमण, मलनिस्सारण यांच्यासह महत्त्वाच्या विभागांचा समावेश असणार आहे.
शहरातील विविध भागांतील नागरिकांना दररोज नवीन प्रश्नांना सामोरे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून शहरात झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या पथ विभागाने केलेल्या कामाची गुणवत्ता समोर आली आहे. मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यामधून वाहन चालविताना नागरिकांची आणि वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यावरच साचून राहत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्ते, पदपथांवर विक्रेते, दुकानदार अतिक्रमण करत असल्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे. काही भागात दुकानांचे साहित्य थेट रस्त्यावर ठेवल्याने रस्ते अरुंद बनले आहेत. याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. याची दखल घेत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी यांंना आवश्यक त्या सूचनाही केल्या होत्या.
मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अभियंता, अधीक्षक अभियंता यांना नागरिकांच्या अडचणी, प्रश्न समजावेत, यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिल्या आहेत.
‘पुढील काही दिवसांत महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी यांच्यासह उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त प्रत्यक्ष शहरातील विविध भागांत फिरून प्रश्न जाणून घेणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये पथ, अतिक्रमण, मलनिस्सारण यांच्यासह इतर महत्त्वाच्या विभागांचा समावेश असणार आहे,’ असे आयुक्त राम यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर येणाऱ्या समस्या, अडचणी यांची जाणीव संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना व्हावी, त्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाणे आवश्यक आहे. यासाठी सर्व अधिकारी रस्त्यावर उतरून पाहणी करणार आहेत. महापालिका आयुक्त म्हणून स्वत: यामध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील. – नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका.