पुणे : महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. मंगळवारपर्यंत प्रभागरचनेवर १ हजार ३८२ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. मंगळवारी एका दिवसात ७८५ हरकती दाखल झाल्या आहेत. ४१ पैकी ८ प्रभागांमध्ये एकही हरकत दाखल झालेली नाही.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यांपैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे महापालिकेचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहे. प्रभागरचना करताना नैसर्गिक हद्दींचे उल्लंघन करण्यात आल्याने अनेक माजी नगरसेवक हरकती-सूचना नोंदविण्यासाठी सरसावले आहेत.
प्रभागात अनुकूल असलेला भाग जोडावा, प्रतिकूल असलेला भाग काढून टाकावा, गल्ल्यांऐवजी मुख्य रस्त्यांवरून प्रभागाची सीमा निश्चित करावी, यासह इतर हरकती घेतल्या जात आहेत. प्रभागरचनेवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यंत असून, दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना या हरकती, सूचना नोंदविता येणार आहेत, असे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमाननगर-लोहगाव प्रभागात सर्वाधिक हरकती
महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-लोहगावमध्ये सर्वाधिक ३८१ हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे–वडगाव बुद्रुकमध्ये २७८ आणि प्रभाग १५ मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळीमध्ये २२४ हरकती-सूचना आल्या आहेत.
महाविकास आघाडी न्यायालयात जाणार
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचना करताना यामध्ये हस्तक्षेप केला असून भाजपला फायदेशीर ठरणारी प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
प्रभाग रचना करताना ती कोणत्या पद्धतीने करावी. त्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम आणि सूचना घालून दिलेल्या आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने महापालिकेची प्रभाग रचना करण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीचा शहरातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अनेक प्रभागांमध्ये नैसर्गिक हद्दी, नदी, नाले, मुख्य रस्ते, याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने प्रभाग फोडण्यात आले आहेत. यावर मोठ्या संख्येने हरकती आणि सूचना नोंदविण्यात येणार आहेत.
या हरकती आणि सूचनांची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेमध्ये बदल न केल्यास न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.