scorecardresearch

गणेश बीडकर का रवींद्र धंगेकर?

धंगेकर यांना पक्षात घेतल्यास राजीनामा देण्याचा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला होता

PMC Election 2017
PMC Election 2017: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी जोरदार चुरस असून मतदार ‘पर्वितन’ घडविणार की सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारडय़ात मते टाकणार हेही मतदानावर अवलंबून राहणार आहे.

 

चर्चेतील प्रभाग – प्रभाग क्रमांक- १६ कसबा पेठ-सोमवारपेठ

महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागांची निश्चिती झाल्यापासूनच सर्वाचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभाग क्रमांक सोळामध्ये भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेता गणेश बीडकर आणि काँग्रेसने पुरस्कृत केलेले रवींद्र धंगेकर यांच्यात सरळ-सरळ लढत होत असून ही लक्षवेधी ठरणार आहे. हे दोघेही विद्यमान नगरसेवक असून भाजपच्या बालेकिल्ल्यात होत असलेली ही लढत बदललेल्या राजकीय संदर्भामुळेही चर्चेत राहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका संगीता तिकोणे यांचे पती राहुल हेही याच गटातून निवडणूक लढविणार असले तरी खरी लढत ही धंगेकर आणि बीडकर यांच्यात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्यात प्रभागांची फेररचना झाल्यानंतर कसबा पेठ-सोमवार पेठ हा प्रभाग अस्तित्वात आला. प्रभागाची अंतिम रचना आणि आरक्षणाची सोडत स्पष्ट झाल्यानंतरच या प्रभागातून विद्यमान नगरसेवक गणेश बीडकर आणि रवींद्र धंगेकर हे समोरासमोर येणार हे स्पष्ट झाले होते. तेव्हापासूनच महापालिकेच्या वर्तुळात या लढतीबाबत चर्चा सुरू होऊन अनेक तर्क-वितर्कही लढविण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर काही नाटय़मय घडामोडी या प्रभागात घडल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक असलेले धंगेकर यांना भारतीय जनता पक्षामध्ये आणण्याच्या हालचाली पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सुरु केल्या होत्या. तशी उघड-उघड चर्चाही सुरू झाली होती. त्यांच्या या प्रवेशाला बीडकर आणि पालकमंत्री गिरिश बापट यांनी स्पष्ट विरोध केला. या पक्षप्रवेशाच्या वादामुळे बापट आणि काकडे आमने-सामनेही आले. धंगेकर यांना पक्षात घेतल्यास राजीनामा देण्याचा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला होता, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसचा पर्याय स्वीकारला. मात्र काँग्रेसकडून अस्लम बागवान यांनाही एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे धंगेकर यांना अखेर काँग्रेस पुरस्कृत जाहीर करण्यात आले.

प्रभागाची रचना, आरक्षण लक्षात घेता धंगेकर हे भाजपमध्ये आले असते तर बीडकर यांना उमेदवारी मिळणे अडचणीचे झाले असते. याच विधानसभा मतदारासंघातून धंगेकर यांनी बापट यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढवली आहे. हीच बाब त्यांना प्रवेश नाकारण्याला कारणीभूत ठरली. मुळातच बीडकर आणि धंगेकर हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. त्याला आता राजकीय संदर्भही जोडला गेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही उमेदवारांमध्ये झालेली शाब्दिक चकमक हेही त्याचे उदाहरण ठरले आहे. त्यामुळेच ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला. पालकमंत्री गिरीश बापट हे सलगपणे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे सहाजिकच या प्रभागावर आणि विधानसभा मतदार संघातील प्रत्येक घडामोडींवर त्यांचे लक्ष असते. काँग्रेसची प्रतिष्ठाही धंगेकर यांच्यामुळे पणाला लागली आहे. धंगेकर-बीडकर हा सामना रंगणार असला तरी मनसेचे राहुल तिकोणे यांचे त्यांना आव्हान आहे. मनसेच्या विद्यमान नगरसेविका संगीता यांचे ते पती असून संगीता याही याच प्रभागातून निवडणूक लढवित आहेत.

* भाजप-काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

* धंगेकर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार

* प्रभागात तिरंगी लढत

* लढतीमागे बदलेले राजकीय संदर्भ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2017 at 03:39 IST
ताज्या बातम्या