पुणे : धरणातून उचलले जाणारे पाणी आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारे पाणी यामध्ये असलेल्या तफावतीचा अभ्यास करून पाणी गळती थांबविण्यासाठी महापालिकेने शहरात १०० टक्के पाण्याचे मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. जे नागरिक मीटर बसविण्यासाठी विरोध करतील, त्यांचा नळजोड बंद करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महापालिकेत पाणीवापराबाबत बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे महापालिकेला १४ टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर असताना महापालिका २२ टीएमसी पाणी वापर करीत असल्याचा दावा विखे-पाटील यांनी केला होता. पुढील दोन महिन्यांत पाण्याची गळती नक्की कोठे आणि किती होते, याचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली होती.
या बैठकीनंतर पाण्याची गळती रोखण्यासाठी पावले उचलण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.

शहरात पाणी मीटर बसविण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाने पुढील महिनाभरात पाण्याचे मीटर बसविण्याचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पाण्याचे मीटर बसविल्यानंतर प्रत्यक्षात महापालिका धरणातून उचलत असणारे पाणी आणि पाण्याचा होणारा वापर याची सविस्तर आकडेवारी स्पष्ट होईल.

काही भागात पाण्याचे मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून विरोध होत आहे. विरोध केल्यास संबंधितांचा नळजोड बंद करावा किंवा त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त चंद्रन यांनी दिले आहेत. पाण्याचे मोजमाप होण्यासाठी मीटर बसविणे आवश्यक असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील महापालिकेने केले आहे.

समान पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती काय?

  • पाण्याच्या टाक्या – ७९ पैकी ६७ टाक्यांची कामे पूर्ण, २४ टाक्या कार्यान्वित, १२ टाक्यांची कामे सुरू
  • मुख्य दाबनलिका – १०१.५४ किमी, ९५.९४ किमीचे काम पूर्ण, ५.६० किमीचे काम सुरू
  • वितरण नलिका- १२६८.९७ किमी, १०९०.७८ किमीचे काम पूर्ण, १६१.६५ किमीचे काम सुरू
  • पाण्याचे मीटर – २ लाख ३२ हजार ६५३, १ लाख ८३ हजार ५१६ मीटर बसविण्यात यश, ४९ हजार १३६ मीटर बसविणे बाकी
  • पाणीपुरवठा झोन – १४१, ४१ (११ झोन गळती शोधणे व दुरुस्ती कामे पूर्ण) १०० झोनची कामे अद्याप नाहीत.