पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) बस थांबे उभारताना महापालिकेच्या पथ विभागाची खोदाईसाठी; तसेच आकाशचिन्ह विभागाचा परवाना न घेणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच ‘पीएमपी’चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक (व्यावसायिक) दत्तात्रय झेंडे यांची वाघोलीचे उपमुख्य व्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली आहे.

महापालिकेचे उत्पन्न बुडविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न करणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे.

पीएमपीचे बस थांबे उभारण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेची परवानगी न घेता परस्पर बस थांबे उभारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संभूस यांनी याबाबतचे पुरावे दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष पंकज देवरे यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. झेेंडे यांची बदली वाघोली येथे करण्यात आली आहे.

‘पीएमपीने तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली. मात्र ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामाकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई करावी. या ठेकेदाराकडून तीनपट दंड वसूल करावा, अन्यथा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल,’ असे संभूस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, पीएमपीएमएलने बीओटी तत्त्वावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पाचशे स्टेनलेस स्टीलचे बस थांबे उभारण्याचे काम ठेकेदाराला दिले होते. या कामाच्या बदल्यात बस थांब्यांवर जाहिराती करण्याचे अधिकार कंपनीला देण्यात आले होते. परंतु संबंधित कंपनीने परवानगी न घेता पदपथांची खोदाई आणि वीजजोड घेतले. याबाबतची तक्रार संभूस यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि देवरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.