पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या चार नगर रचना योजनांना (टाऊन प्लॅनिंग स्कीम- टीपी) राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगी योजनेलाही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीतील गावालगतच्या विकासाला गती मिळणार असून, टीपी स्कीममुळे ६.८ किलोमीटर लांबीचा रिंगरोडचेही विकसन करता येणार आहे.
पीएमआरडीएच्या हद्दीतील गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा आणि रिंगरोडसह अन्य विकासकामांना गती मिळावी, यासाठी टीपी स्कीम राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार चार टीपी स्कीमचे प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आले होते. या चारही प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडीसाठी प्रत्येकी एक-एक आणि होळकरवाडीसाठी दोन अशा एकूण चार टीपी स्कीमला मंजुरी देण्यात आली. तसेच पुणे महापालिकेच्या हद्दीतील फुरसुंगीमधील योजनेचाही यामध्ये समावेश आहे. राज्य शासनाकडून या योजनांना मंजुरी मिळाल्यामुळे पुढील प्रक्रिया पीएमआरडीए प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, योजनांना मंजुरी मिळाल्यामुळे चर्चा करून रस्ते ताब्यात घेण्याचा मार्गही मोकळा झाला असून, नव्याने प्रस्तावित केलेल्या पंधरा योजनांसाठीची जाहीर सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, नागरिक आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आराखडे निश्चित करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
पंधरा नव्या टीपी स्कीमसाठी सूचना जाहीर
पीएमआरडीए अंतर्गत ६५ मीटर रुंद वळण रस्त्याचे क्षेत्र मिळविण्यासाठी एकूण १५ टीपी स्कीम घोषित करण्याबाबतची सूचनाही जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द-१ आणि मांजरी खुर्द-२, मांजरी खुर्द-३, हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील माण, धामणे, गोदुंबरे, दारुंबरे- साळुंब्रे १ दारुंबरे-साळुब्रे-२, सांगवडे, नेरे, बावधन बुद्रुक या गावातील नगर योजनांचा समावेश आहे.
टीपी स्कीमला मंजुरी मिळाल्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळणार आहे. नव्याने प्रस्तावित केलेल्या पंधरा योजनांबाबतही स्थानिक पातळीवर संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांची बाजू ऐकून योजनेची अंमलबजावणी करताना त्यांच्या सूचनांना विचार केला जाईल. त्यानुसार योजनांचे आराखडे तयार केले जातील. – डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए.