पुणे : लोकसभा निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला होता. आमदार रोहित पवार यांनी याबाबत समाजमाध्यमातून चित्रफीत प्रसारित करून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला होता. अखेर याची दखल घेऊन बारामती पोलिसांनी निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत केशव तुकाराम जोरी (वय ३९) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोरी बारामती पंचायत समितीत शाखा अभियंता आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व कलम १२३ (१), तसेच भादंवि १७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ मे रोजी बारामतीतील साठेनगर परिसरात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १६७ परिसरात पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा : खासगी बालवाड्या अद्याप नियमाविना… झाले काय?
राेहित पवार यांनी समाजमाध्यमातून चित्रफीत प्रसारित केली होती. या चित्रफितीची पडताळणी करण्यात आली. मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचे चित्रफितीत दिसून आल्यानंतर जोरी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.