पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्याच्या गृह विभागाने अखेर १५ हजार ६३१ पोलिस शिपायांच्या (Police Constable) मेगा पदभरतीची (Mega Recruitment) प्रक्रिया सुरू केली आहे.
या मेगा पोलीस भरतीमध्ये मुंबई शहर पोलीस दलात सर्वाधिक जागा असून, त्या खालोखाल पुणे पोलीस दलात भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी १ हजार ७३३ जागा, वाहन चालक शिपाई पदासाठी १०५ आणि बॅन्डमन पदासाठी ३३ जागा भरल्या जाणार आहेत. त्याबरोबर पुणे कारागृह विभागात १३० पदांची भरती करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात ३२२ जागा आणि पुणे ग्रामीण पोलिस दलात ७२ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
‘एका पदासाठी, एकच अर्ज’
उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. एका पदासाठी उमेदवारास एकाच जिल्ह्यात एकमेव अर्ज करता येणार आहे. जर उमेदवाराने एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज केल्यास, ते अर्ज बाद ठरवण्यात येणार आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५० आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रूपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
‘निवड प्रक्रिया’
- मैदानी चाचणी (Physical Test) : उमेदवारांना मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- लेखी परीक्षा (Written Exam): मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी दहा जणांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाईल.
- अंतिम निवड : लेखी परीक्षेतील गुणांच्या मेरिटनुसार उमेदवारांची पोलिस पदांसाठी निवड होणार आहे.
असा करा अर्ज
पोलीस भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना policerecruitment2025.mahait.org हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पुणे शहर पोलीस दलात अंदाजे दीड ते दोन लाख उमेदवारांचे अर्ज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे शहर पोलीस दलात ऐतिहासिक उच्चांकी पदांची भरती होत आहे. आचारसंहितेआधी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य झाली आहे. आता वेळेवर ही प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. या भरतीने पुणे पोलीस यंत्रणेला बळकटी मिळेल. – विठ्ठल बडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.
