शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ‘शिरूर शहर विकास आघाडी’चे वर्चस्व कायम राहणार की भाजप आव्हान उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. महायुतीतील मित्रपक्ष एकत्र लढणार की स्वबळावर; तसेच धारिवाल यांच्या आघाडीत महायुती किंवा महाविकास आघाडीतील कोणते पक्ष साथ देणार, याबाबत औत्सुक्य असणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारिवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘शिरूर शहर विकास आघाडी’ची नगरपालिकेवर निर्विवाद सत्ता आहे. या आघाडीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा समावेश होता.
सध्या नगरपालिकेत शहर विकास आघाडीचे १७, भाजपचे २, तर लोकशाही क्रांती आघाडी व अपक्ष प्रत्येकी १ असे नगरसेवक आहेत. भाजपने ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा देत मागील निवडणुकीत दोन जागा जिंकत आपले अस्तित्व दाखवून दिले. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर शहरात सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे.
रवींद्र धनक यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही क्रांती आघाडीने मागील निवडणुकीत प्रभावी लढत दिली होती. यंदाच्या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत आघाडी दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे धनक यांनी सांगितले.
धारिवाल यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिरूर शहर विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश धारिवाल यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यांच्या भूमिकेवरच शिरूरच्या राजकीय समीकरणांचे भवितव्य ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांचा कल सध्या धारिवाल यांच्या आघाडीकडे असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप आणि शिवसेना (शिंदे) हे पक्ष एकत्र की स्वबळावर लढणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यावरच निवडणुकीतील चुरस अवलंबून असेल.
नगराध्यक्षपदासाठी महिला इच्छुकांची रांग
यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून, या पदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये मालती पाचर्णे, मेघना पाचर्णे, ऐश्वर्या पाचर्णे, सुवर्णा लोळगे, सुवर्णा लटांबळे, अलका खांडरे, मनीषा कालेवार, सोनिया दसगुडे, प्रज्ञा पठारे, अंजली मयूर थोरात, वत्सला पाचंगे, रोहिणी बनकर अशी नावे पुढे आली आहेत.
राजकीय हालचालींना वेग
निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी मतदारांसाठी निसर्ग पर्यटन, देवदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन सुरू असून, समाजमाध्यमांवर संदेश पाठविण्यास सुरुवात केली आहे. यंदा नगरसेवकांची संख्या २१ वरून २४ झाली असून, शहरात १२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असून, मतदारसंख्या ३२,९९३ आहे.
