पुणे : ‘नवीन कलाकारांचा शोध घेऊन त्यांना संधी देणे, उपलब्ध कलाकारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून नाट्यनिर्मिती करून घेणे हेच नाट्य परिषदेचे काम आहे,’ अशी भूमिका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सोमवारी मांडली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रशांत दामले यांच्या हस्ते गिरीश ओक यांना नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, अवंती बायस यांना माणिक वर्मा पुरस्कार, प्राजक्ता हनमघर यांना इंदिरा चिटणीस पुरस्कार, प्रशांत तपस्वी यांना यशवंत दत्त पुरस्कार, सुवर्णा चव्हाण यांना गो. रा. जोशी पुरस्कार, निपुण धर्माधिकारी यांना पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार, राहुल जोशी यांना वसंतराव देशपांडे पुरस्कार, चिन्मय पाटसकर यांना गंगाधरपंत लोंढे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी दामले बोलत होते.
पन्नास वर्षांहून अधिक काळ नाट्यसेवेबद्दल सुरेश साखवळकर यांना सन्मानित करण्यात आले. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, शोभा कुलकर्णी, कोषाध्यक्ष अशोक जाधव या वेळी उपस्थित होते.
नाटक ही सांघिक कला आहे, असे सांगून दामले म्हणाले, ‘युवा कलाकारांनी आधी एकांकिकांमध्ये काम करावे. त्यानंतर दीर्घांक, प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक अशी त्याची चढती पायरी असली पाहिजे. नाटकाकडून चित्रपटाकडे असा प्रवास झाला पाहिजे. नाट्य परिषदेच्या ६० पैकी ३२ शाखा सक्रिय असून त्यामध्ये पुणे शाखा आघाडीवर आहे.’