पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ आरोपींविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.मोहोळचा खून ५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता.

याप्रकरणी गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुनील तांबे तपास करत आहेत.

हेही वाचा >>>पंतप्रधानांचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था करा, शिक्षण विभागाचा आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारणेच्या मागावर गुन्हे शाखेची पथके

मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत. अद्याप मारणेचा ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. विठ्ठल शेलारसह सर्व आरोपींची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पसार झालेल्या मारणेने त्याच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.