लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२४मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यात एकूण २४ परीक्षांचा समावेश असून, देशभरातील लाखो उमेदवारांची पसंती असलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे २०२४ रोजी, तर मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२४मध्ये होणार आहे. संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्याने आता उमेदवारांना तयारीचे अधिक व्यवस्थित नियोजन करणे शक्य होणार आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकामध्ये परीक्षेच्या तारखांसह जाहिरात कधी निघणार, अर्ज करण्याची अंतिम मुदत असा तपशील देण्यात आला आहे.
आणखी वाचा-प्रदीप कुरुलकरांना २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी; येरवडा तुरुंगात त्यांना ‘या’ गोष्टी मिळणार नाहीत…
त्यानुसार अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १८ फेब्रुवारीला सीडीएस परीक्षा (१) २१ एप्रिलला नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे रोजी, भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २६ मे रोजी, संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा १४ जुलैला, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा ४ ऑगस्टला होणार आहे. या परीक्षांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संभाव्य वेळापत्रक यूपीएससीच्या संकेतस्थळावर पाहता येईल. परिस्थितीनुसार परीक्षेचा तारखा, अधिसुचना किंवा परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदतीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असे यूपीएससीने नमूद केले आहे.