लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामतीमध्ये जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी, लॉजिस्टिक पार्क, कर्करोग रुग्णालयाबरोबरच वाहतुकीसाठी स्वतंत्र केंद्र आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य असलेला बारामती मतदार संघाचा जाहीरनामा राष्ट्रवादी (अजित पवार)कडून बुधवारी जाहीर करण्यात आला. ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ असे या जाहीरनाम्याला नाव देण्यात आले असून, बारामतीच्या सर्वांगीण विकासाचा दावा अजित पवार यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून राज्यासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघासाठीही स्वतंत्र जाहीरनामा पक्षाकडून करण्यात आला आहे. बारामती मतदारसंघासाठीच्या जाहीरनाम्यातील बाबींची माहिती अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

आणखी वाचा-महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘बारामती शहर आणि ग्रामीण भागात गेल्या तीस ते पस्तीस वर्षात मोठा बदल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात नऊ हजार कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत. राज्यातील अन्य कोणत्याही मतदारसंघात एवढी मोठी कामे झालेली नाहीत. बारामतीसाठी प्रगतीचा नवा आलेख करण्याचे ध्येय आहे. त्यानुसार जाहीरनाम्याच्या माध्यमातून बारामतीचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

बारामतीमध्ये पहिली जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभारण्यात येईल. त्यामध्ये कुस्ती, जलतरण, बॉक्सिंग आदी खेळांसाठीच्या सुविधा देण्यात येतील. शेतकऱ्यांसाठी कृषी आधारित एमएसएमई प्रणाली, अन्नप्रक्रिया उद्योगाची स्थापना करण्यात येणार आहे. देशातील पहिले सौर ऊर्जा शहराचा मानही बारामतीला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याशिवाय कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कर्करोग रुग्णालयाची उभारणीही करण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे.

आणखी वाचा-हिंजवडी आयटीपार्कमधून किती उद्योग बाहेर गेले? देवेंद्र फडणवीस यांनी आकडाच सांगितला

आत्याबाईला मिशा असत्या तर…

मुख्यमंत्री होण्याचे अजित पवार यांची महत्त्वकांक्षा आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी तुम्ही भाजपबरोबर गेला असता तर, मुख्यमंत्री झाला असता का,’ अशी विचारणा पत्रकारांनी यावेळी केली. त्याला ‘आत्याबाईला मिशा असत्या तर, अशी एक म्हण मराठी भाषेत आहे. जर आणि तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा विषय आता बोलण्यात काही अर्थ नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छान वाटले आणि नाही!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या कौतुकासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी ‘छान वाटले’ अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, बारामतीसाठी पुढील तीस वर्षे नव्या पिढीला संधी द्यायची आहे, या शरद पवार यांच्या विधानावर ‘हे छान वाटले नाही’ असे उत्तर अजित पवार यांनी दिले.