कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर सराइत चोरट्याने कारागृहातील महिला रक्षकाला दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील लिपिक बोलत असल्याच्या बतावणीने चोरट्याने महिला रक्षकाला बदलीची धमकी दिली आणि बदली न करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळले. या प्रकरणी चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी अमित जगन्नाथ कांबळे (वय ३५) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत कारागृहातील महिला रक्षकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित कांबळे याच्या विरोधात शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. येरवडा कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृहातून त्याची नुकतीच सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याने महिला रक्षकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी त्याने केली. लिपीक इंगळे बोलत असल्याचे त्याने सांगितले. तुमची बदली करण्यात येत असल्याचे त्याने सांगितले.

तुम्ही ज्या ठिकाणी नेमणुकीस होता, तेथून पाच ते सहा तक्रारी आल्या आहेत, असे त्याने सांगितले. मी तुमची बदली रोखण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी तातडीने दहा हजार रुपये ऑनलाइन पाठवा, अशी बतावणी त्याने केली. त्यामुळे कारागृह रक्षक महिला घाबरली आणि त्याला ऑनलाइन पैसे पाठविले. महिलेने कारागृह प्रशासन कार्यालयात याबाबतची चौकशी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक वारंगुळे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. तो ससून रुग्णालयात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

अमित कांबळे कोण ? –

अमित कांबळे सराइत चोरटा आहे. वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून त्याने नागरिकांना गंडा घातल्याचे गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कांबळे याने कारागृहातील आणखी चार ते पाच महिला रक्षकांशी संपर्क साधून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. त्याने कारागृहातील रक्षकाचे मोबाइल क्रमांक कसे मिळवले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.