पुणे : यंदा गणेशोत्सवात सात दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशा सूचना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.
गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
शेलार म्हणाले, ‘गणेशोत्सवात सात दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी त्याबाबत निर्णय घेतील. यंदाच्या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे. गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीतील १२ गडकिल्ले, पर्यावरण या विषयावर जनजागृती करण्याकरिता गणेश मंडळांना जिल्हाप्रशासनाने प्रोत्साहन द्यावे,’ अशा सूचनाही त्यांनी केल्या.
‘गणेशोत्सवानिमित्त सर्वांना सन्मान झाला पाहिजे, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे. विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध स्पर्धां आयोजित कराव्यात. मराठी संस्कृती, कलाकार, पंरपरांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावे. वेगवेगळ्या विषयांबाबत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करून समाजमाध्यमांद्वारे व्यापक स्वरुपात प्रसार आणि प्रचार करावा,’ अशी सूचनाही शेलार यांनी केली.