पुणे : ‘प्रतिभावान लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांचा भावार्थ समजणे अवघड असते. त्यांच्या ‘वंश’ या कथेवर साकारलेल्या लघुपटाद्वारे उत्तम वातावरणनिर्मिती झाली असून, पात्रांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत सहजतेने पोहोचत आहेत’, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सावी आर्ट्स आणि वाइड विंग्ज मीडियातर्फे दोन वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या ‘वंश’ या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्या प्रसंगी डाॅ. आगाशे बोलत होते. ’जीएं’च्या भगिनी नंदा पैठणकर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, तसेच लघुपटातील कलाकार डॉ. वरदा जाधव, सूरज सातव, मैत्रेयी दाते उपस्थित होते. पुणेकरांनी या लघुपटावर पसंतीची मोहोर उमटविली असून, हा लघुपट यू ट्यूबवरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

पैठणकर म्हणाल्या, ‘‘वंश’ ही कथा समजायला आणि माध्यमांतर करायला खूप अवघड आहे. पण, सर्व कलाकारांनी मेहनतीने भूमिका साकारल्या आहेत.’ कुलकर्णी म्हणाले, ‘जी. ए. कुलकर्णी यांचे लेखन जागतिक पातळीवरील आहे. अशा थोर लेखकाच्या साहित्यकृतीचे माध्यमांतर करणे फार जबाबदारीचे असते. तरुण कलाकार-तंत्रज्ञांनी अवघड जबाबदारी पेलून पार पाडणे यासारखे सुख नाही. नवनव्या प्रयोगांतून सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होते.’

सुकथनकर म्हणाले, ‘जीएंच्या कथांमध्ये नियतीचा स्पर्श असतो. ‘वंश’ या कथेतून त्यांनी सामाजिक विषयासंदर्भात जाणीवही करून दिली आहे. लघुपटाच्या माध्यमातून केलेली मांडणी खूप समाधानकारक आहे.’ डॉ. वरदा जाधव यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम, सूरज सातव, मैत्रेयी दाते यांच्या या लघुपटात भूमिका असून, दिग्दर्शन ऋषी मनोहर यांनी केले आहे. निर्मिती गणेश जाधव यांची आहे, तर पटकथा व संवाद गौरव बर्वे यांचे आहेत.