पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. त्यावेळी युद्धजन्य काळात अमृतसरमधील पथदिव्यांचे व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरले. पुण्यातील समुद्र एलईडी या कंपनीच्या या तंत्रज्ञानामुळे हजारो पथदिव्यांचे एकाच वेळी व्यवस्थापन शक्य झाले. याबद्दल अमृतसर स्मार्ट सिटीने समुद्र कंपनीचे कौतुक केले आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान कंपनीच्या लाईटिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (एलएमएस)च्या मदतीने काही क्षणांत शहरातील तब्बल ८० हजार पथदिवे बंद करणे प्रशासनाला सोपे झाल्याने याची मदत ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वपूर्ण ठरली. या मदतीकरीता समुद्र एलईडी कंपनीचे कौतुक अमृतसर स्मार्ट सिटीच्या वतीने नुकतेच करण्यात आले आहे. कंपनीची पथदिवे व्यवस्थापन प्रणाली युद्धजन्य परिस्थितीत अतिशय मोलाची ठरली, असे स्मार्ट सिटीने म्हटले आहे.

याबाबत समुद्र एलईडी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल थोते म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी समुद्र एलईडीने पंजाबमधील अमृतसर येथील स्थानिक प्रशासनाला मदत केली. गेल्या काही वर्षांत या शहरात पथदिवे बनविण्याचे काम समुद्र एलईडी कंपनीकडे आहे. ऑपरेश सिंदूरदरम्यान आमच्या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या पथदिवे व्यवस्थापन प्रणालीचा फायदा झाला. प्रशासनाने संगणकीय प्रणालीने वेळोवेळी काही क्षणांत अमृतसर शहरातील तब्बल ८० हजार पथदिवे बंद आणि चालू केले.

युद्धजन्य परिस्थिती हाताळत असताना समुद्र एलईडी कंपनीने तयार केलेल्या संगणकीय प्रणालीच्या मदतीने अमृतसरमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार प्रत्येक वेळी पथदिवे बंद-चालू करण्यात आले. त्यावेळी सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये काही प्रमाणात का होईना आमचाही हातभार लागला, याचे समाधान आहे. – प्रफुल्ल थोते, व्यवस्थापकीय संचालक, समुद्र एलईडी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.