पुणे : पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच ४८) पुणे ते सांगलीपर्यंतच्या मार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून, रस्त्याची दुरवस्था कायम आहे. वाहनचालकांना टोल भरूनही चिखल, खड्डे, वाहतूक कोंडीतून प्रवास कारावा लागत आहे. जुनेच काम पूर्ण झाले नसताना आता हा महामार्ग हरित प्रकल्पांतर्गत (ग्रीन फिल्ड) आठ पदरी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून, विकासाच्या नावाखाली ही नागरिकांची फवसणूक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला. तसेच, समाज माध्यमांवर ‘या रस्त्यावरील खेळ कधी थांबणार’ असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करून या महामार्गाच्या कामाला विरोध दर्शविला आहे.
पुणे ते बंगळुरू या दोन शहरांतील प्रवासाचे अंतर १४ ते १५ तासांवरून अवघ्या सात तासांवर आणण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग भारतमाला परियोजनेेंतर्गत हरित प्रकल्प आठ पदरी करण्यता येणार आहे. नव्या महामार्गाचे काम २०२६ मध्ये सुरू होऊन २०२८ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. बेळगाव ते बंगळुरू हा प्रवास अवघ्या चार ते पाच तासांत होणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे.
‘गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रेंगाळले आहे. रस्त्यावर चिखल, खड्डे, रखडलेले काम यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. पुणे ते सांगली प्रवास दहा तास खर्च करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे,’ कुंभार यांनी सांगितले. तर, दुसरीकडे ‘एनएचएआय’ आणि आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या मार्गावरील जमीन संपादन ७० टक्के झाले असल्याचा दावा केला आहे. केवळ पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा असून लवकरच याबाबत मंजुरी मिळेल असे ‘एनएचएआय’कडून स्पष्ट करण्यात आले.
या महामार्गासाठी अनेक ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी वारंवार बैठका घेतल्या जात असून, लवकरच परवानगी मिळेल. तातडीने काम सुरू करण्यात येईल. – सुभाष घंटे, अभियंता, एनएचएआय
मी मूळ सांगलीचा असून पुण्यात वास्तव्यास आहे. या मार्गावरून प्रवास करताना टोल वसूल केला जातो. मात्र, खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतो. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर बेळगाव ते बंगळूर प्रवास केवळ ४ ते ५ तासांत पूर्ण करता येईल, असे सांगितले जात असले, तरी या कामाचा आनंद वाटावा अशी परिस्थिती नाही. – विजय कुंभार, सामाजिक कार्यकर्ते
दोन दशके झाली आणि कोल्हापूरपर्यंत महामार्गाची दुरवस्था कायम आहे. पुणे ते सांगली महामार्गावरील दुरुस्ती काम ६ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. कराडच्या पुढे कोल्हापूरपर्यंत तर काम पूर्ण थांबलेले आहे. – संदीप शिंदे, नागरिक
