पुणे : ‘शहरात उत्तर प्रदेशबरोबर बिहारमधील कामगारांची, विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या नागरिकांना गावी जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून पुणे ते दरभंगा ही एकमेव एक्स्प्रेस आहे. आठवड्यातून एकच दिवस ही गाडी धावत असून ती दैनंदिन करावी ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. नुकतेच मिथिला समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत रेल्वे मंत्रालय आणि खासदार गोपाल ठाकूर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून उद्योजकतेमुळे परराज्यातून विशेषत: उत्तरप्रदेश आणि बिहार येथील कामगार, विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. ही संख्या वाढत असताना या परराज्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी दरभंगा एक्स्प्रेस (११०३३ आणि ११०३४) ही एकमेव आठवड्यातून एकदा धावणारी गाडी आहे. या गाडीची वारंवारिता दैनंदिन करावी म्हणून गेल्या सहा वर्षांपासून येथील पुणेस्थित कामगार तसेच बिहारमधील मिथिला समाजाच्या नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वेचे विभाग व्यवस्थापकांकडेही मागणी केली होती. त्यानुसार आता येथील नागरिकांनी दिल्लीत जाऊन थेट रेल्वे मंत्रालय आणि स्थानिक खासदारांना निवेदन दिले आहे.
आठवड्यातून एक दिवस (बुधवार) धावणाऱ्या दरभंगा एक्स्प्रेसमध्ये एक एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत सरासरी १४७.३४ टक्के प्रवाशांची गर्दी नोंदली गेली आहे, तर डब्यांच्या रचनेनुसार वातानुकूलित प्रवास १२४.२३ टक्के, थ्री टायर वातानुकूलित प्रवासासाठी १४१.५२ टक्के आणि आरामदायी (स्लिपर) प्रवासासाठी १५१.४३ टक्के नोंदणी झालेली आहे. ही क्षमतेपेक्षा सर्वाधिक असल्याने या रेल्वेसाठी किती प्रमाणात मागणी आहे, याची आकडेवारी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
दरभंगा एक्स्प्रेस महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांतून एक हजार ९४७ किलोमीटरचे अंतरावर धावते. सुमारे ३८ तास प्रवास असणाऱ्या लांब पल्ल्यासाठी एकमेव गाडी असून दौंड, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, प्रयागराज, वाराणसी, छपरा, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर या स्थानकांवर थांबत जाते.