पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे सहा दिवसांपूर्वी आलिशान कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली.या घटनेतील मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.तर अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.तर आता या प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना मुलासोबत असलेल्या चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील कल्याणीनगर येथे सहा दिवसांपूर्वी आलिशान कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली.या घटनेतील आरोपी अल्पवयीन मुलगा,वडील यांच्यासह सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची घटना होऊन काही तास होत नाही तोवर अल्पवयीन आरोपी मुलास बाल न्याय मंडळाने जामीन दिला.अल्पवयीन आरोपी मुलाला काही तासात जामीन मिळाल्याने,सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर अर्ज केल्यावर,अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करित १४ दिवसा करीता बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा…पुणे : दोन अधिकाऱ्यांना निलंबित करुन कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन मुलास मदत करणार्‍या पोलिस अधिकार्‍यावर कारवाई करावी.तसेच यामध्ये कोट्यावधी रुपयांच अर्थकारण झाल आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली देखील याच अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले.या सर्व घडामोडी दरम्यान काल अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह अन्य सहा जणांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.त्यावेळी या सहा आरोपींना ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

हेही वाचा…पुणे अपघात प्रकरणात मुलाला वाचविण्याचे वडिलांकडून प्रयत्न; मुलगाच वाहन चालवीत असल्याचे पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

तर आता या प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनी अपघातावेळी मुलासोबत असलेल्या चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून आजोबाला अटक केली आहे.या आरोपी सुरेंद्र अगरवालला आज दुपारी गुन्हे शाखेकडून न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा…देशभरातील २३ आयआयटीत रोजगाराची दैना… यंदा किती विद्यार्थी राहिले नोकरीविना?

वरिष्ठांना वेळेत माहिती न दिल्याने दोन पोलिस अधिकारी निलंबित

येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कल्याणीनगर भाग येतो. मात्र अपघाताच्या घटनेची येरवडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी या दोन्ही अधिकार्‍यांनी अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत दिली नाही.तसेच तपासात दिरंगाई या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दोन्ही अधिकार्‍यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढले.