पुणे : आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ समाजमाध्यमात धमकीचे ‘स्टेटस’ ठेवणाऱ्या पाच जणांना समर्थ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पाज जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पीयूष बिडकर, अथर्व नलावडे, ओंकार मेरगू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी धमकी देणारे ‘स्टेटस’ समाजमाध्यमातील खात्यावर ठेवले होते. सराइतांकडून समाजमाध्यमात प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशांवर पोलिसांनी नजर ठेवली होती. आंदेकर टोळीतील सराइत भालेराव, बिडकर, नलावडे, मेरगु यांनी धमकीचे ‘स्टेटस’ ठेवल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ धमकीचे ‘स्टेटस’ ठेवून दहशत माजविल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता.

या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), अमन युसूफ पठाण (वय २५), सुजल राहुल मेरगु (वय २०), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ३६), मुनाफ रिजाय पठाण (वय २८, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली होती.

आंदेकर टोळीने नाना पेठेत केलेल्या बेकायदा बांधकामांवर पोलिसांनी महापालिकेच्या वतीने कारवाई केली होती. नाना पेठेतील आंदेकरच्या घरातून ७७ तोळे दागिने, माेटार, जमीन व्यवहारांची कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. महापालिकेने बेकायदा फलक लावल्या प्रकरणी आंदेकर टोळीतील सराइतांविरुद्ध नुकतीच कारवाई केली होती. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींची नाना पेठेत धिंड

आंदेकर टोळीची नाना पेठेत दहशत आहे. आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ धमकीचे ‘स्टेटस’ ठेवून दहशत माजविल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नाना पेठेतून त्यांची धिंड काढली. आंदेकर टोळीने धमकावून खंडणी मागितली, तसेच बेकायदा जागेचा ताबा घेतल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी, तसेच टोळीतील सराइत किंवा समर्थकांनी दहशत माजविल्यास पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केले आहे.