पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. अपहरण प्रकरण उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांनी १२ तासात वडिलांची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

अभिजीत दत्तात्रय भोसले (वय २२), रणजीत रमेश डिकोळे (वय २१), मारूती अशोक गायकवाड (वय २३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा साथीदार सागर खुरंगळे हा पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर भागातील एका तरुणाचे तरुणीशी प्रेमसंबंध होते. तरुणी वाघोली भागात राहायला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांचा प्रेमप्रकरणास विरोध होता. तरुणी ३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीय हडपसर भागात राहणाऱ्या तरुणाच्या घरी गेले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास तरुणीचे नातेवाईक आणि तिघे आरोपी तरुणाच्या घरी आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी तरुणाच्या वडिलांना धमकाविले. त्यांना धमकावून दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यांचे दुचाकीवरुन अपहरण करण्यात आले. या घटनेची माहिती तरुणाच्या आईने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी तरुणाच्या वडिलांना घेऊन वाडेबाेल्हाई, केसनंद भागात गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी बार्शीकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाका येथे सापळा लावून आरोपींना पकडले. त्यांच्या तावडीतून तरुणाच्या वडिलांची सुटका केली. वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे आणि पथकाने ही कारवाई केली.