पिंपरी : महिलेसोबत प्रेम असल्याचे बोलून त्याबाबतचे ध्वनिमुद्रित संभाषण (कॉल रेकॉर्डिंग) पतीला पाठवण्याची धमकी देत महिलेकडून एक लाख ९५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार चिखलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बिमल उर्फ निशांत मोतीलाल पांडे (वय २५, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी बिमल यांची ओळख आहे. बिमल याने महिलेला दूरध्वनी करून तसेच प्रत्यक्ष भेटून त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, महिलेने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर बिमल याने महिलेसोबत बोलतानाचे संभाषण ध्वनिमुद्रित तिच्या पतीला पाठवण्याची तसेच समाज माध्यमावर प्रसारित करण्याची करण्याची धमकी दिली. पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास फिर्यादी महिला आणि तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेकडून ऑनलाइन माध्यमातून एक लाख ९५ हजार रुपये खंडणी घेतली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
पारपत्रासाठी खोटी कागगदपत्रे दिल्याने गुन्हा
पारपत्रासाठी (पासपोर्ट) खोटी कागदपत्रे दिल्याबाबत पिंपरीमधील एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ ऑक्टोबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात घडला. या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक रूपेश मोरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरीतील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पात्ररपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे. अर्ज करण्यासाठी त्यांनी इतर कागदपत्रांसोबत जन्माचा बनावट दाखला जोडला. आपला जन्माचा दाखला बनावट असल्याचे त्यांना माहिती असतानाही शासकीय कामासाठी तो खरा असल्याचे भासवले. कागदपत्रांच्या पडताळणी मध्ये हा प्रकार समोर आला. त्यांनतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी पिंपळे गुरव येथे करण्यात आली. आकाश काशीराम चौरे (१९, पिंपरी. मूळ रा. धुळे), विकी राजेंद्रसिंग धामी (१९, पिंपरी, मूळ रा. उत्तराखंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील काशीद पार्क येथे दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ८७ हजार ८०० रुपये किमतीचा गांजा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
