पुणे : एका महिलेने काॅफीच्या पाकिटातून अमली पदार्थ तस्करी केल्याचा प्रकार सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने उघडकीस आणला. बँकॉकहून काॅफीच्या पाकिटातून आणलेले पाच किलो मेथोक्वालोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबईतील एका महिलेला अटक करण्यात आली. जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत दोन कोटी ६१ लाख रुपये इतकी किंमत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

फहेमिदा मोहम्मद साहिद अली खान (वय ४४, नयानगर, रहेजा हॉस्पिटल मार्ग, माहीम पश्चिम, मुुंबई) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सीमाशुल्क विभागाच्या निरीक्षक पलक यादव यांनी फिर्याद दिली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून गुरुवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी आलेले विमान पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्या वेळी फहेमिदा खान विमानतळाच्या आवरातून गडबडीत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात हाेती. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने तिच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. पथकातील अधिकाऱ्यांनी तिच्याकडील सामानाची तपासणी केली. बॅगेत कपडे, चाॅकलेट, काॅफीची पाकिटे सापडली.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काॅफीच्या पाकिटाची तपासणी केली, तेव्हा त्यात पांढऱ्या रंगाची भुकटी (पावडर) सापडली. ही पांढऱ्या रंगाची भुकटी मेथाक्वालोन नावाचा अमली पदार्थ असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अजय मलिक, मनीषा बिनाॅय यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पलक यादव, अभयकुमार गुप्ता आणि पथकाने ही कारवाई केली.खान हिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. ‘या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे. अमली पदार्थ ती कोणाला देणार होती, या दृष्टीने तपास करण्यात येणार असल्याने खानला पोलीस कोठडी द्यावी,’ अशी विनंती विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी केली. न्यायालयाने महिलेला कोठडी सुनावली.