पुणे : बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे, तसेच महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांसाठीच्या प्रचार सभा होणार असून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. या दोन्ही सभांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार असून पुढील काही दिवस प्रचाराची धार वाढणार आहे.

हेही वाचा – अजित पवारांनी सपत्निक घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; सुनेत्रा यांनी देवाला केली ‘ही’ प्रार्थना

महाविकास आघाडी शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे गुरुवारी (१८ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून एकत्र येत निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. धंगेकर आणि कोल्हे जिल्हाधिकारी कार्यालयात तर, सुप्रिया सुळे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निवडणूक अर्ज दाखल करतील. यानंतर जवळच असलेल्या हॉटेल शांताईजवळ भव्य प्रचार सभा होणार असून तेथे तीनही उमेदवारांच्या प्रचारानिमित्ता शरद पवार यांची सभा होणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार विभागी आयुक्तांच्या कार्यलायात सकाळी साडेदहा वाजता उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, पुणे जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हाॅटेल ब्लू नाईल येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सभा होणार आहे.

हेही वाचा – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन

पुणे आणि शिरूर लोकसभेसाठी येत्या १३ मे रोजी तर बारामतीसाठी ७ मे ला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून प्रचार सुरू झाला आहे. वैयक्तिक भेटीगाठी, नागरिकांबरोबर संवाद, पदयात्रांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघण्यास सुरुवात झाली असतानाच आता नेत्यांच्या प्रचार सभेमुळे प्रचारात रंगत निर्माण होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा एकाच वेळी आणि एकाच दिवशी असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडणार असून राजकीय वातावरण तापणार आहे.