पुणे : ‘ठसकेबाज लावणी शृंगारिक असली तरी ती अश्लीलतेकडे जाता कामा नये याचा वस्तुपाठ गदिमांच्या गीतांनी घालून दिला. त्यामुळे लावणी इतकी सोज्वळ असावी की लहान मुलीला स्नेहसंमेलनामध्ये त्या गीतावर नृत्य करावे असे वाटेल, हा कटाक्ष मी ’नटरंग’ची लावणी लिहिताना ठेवला. माझ्या गीतलेखनामध्ये गदिमांची प्रेरणा आहे’, अशी कृतज्ञ भावना प्रसिद्ध कवी-गीतकार गुरू ठाकूर यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

बेलवलकर सांस्कृतिक मंचच्या वतीने ‘ऐसी अक्षरे’च्या ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या माडगूळकर बंधूंच्या साहित्यावरील विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि गुरू ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ठाकूर बोलत होते. मंचचे समीर बेलवलकर, ‘ऐसी अक्षरे’ मासिकाचे संपादक पद्मनाथ हिंगे, राधा बेलवलकर या वेळी उपस्थित होत्या. यानिमित्ताने गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्यिक प्रवासावर आधारित ‘दोन पाती-एक बंध’ हा विशेष दृकश्राव्य कार्यक्रम राजेश दामले यांनी सादर केला. दृकश्राव्य कार्यक्रमाच्या संहितेचे लेखन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी आणि जयश्री बोकील यांचे होते.

गुरू ठाकूर म्हणाले, ‘माडगूळकर बंधू मला प्रथम दिवाळी अंकातून भेटले आणि आज माडगूळकरांवरील दिवाळी अंकाचे प्रकाशन होत आहे, त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना मनात आहे. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला माडगूळकर भेटत गेले आहेत. त्यांच्या लेखनातल्या चित्रमयतेचे बोट धरण्याचा मी प्रयत्न केला. व्यक्तिरेखा, त्यांचे वर्णन, भाषा, आशय प्रत्येक टप्प्यावर दोन्ही माडगूळकरांचे कर्तृत्व सतत जाणवते. मला माडगूळकर असे भेटत राहिले नसते, तर आज मी जिथे आहे, तिथे नसतो. ज्या मातीत जन्मलो, तिथे रुजा, तिथे फुलून आल्यावर इतर विचार करा, हे तत्त्व मला तात्यांच्या लेखनातून उमगले.

ऐसी अक्षरेच्या प्रत्येक धुंचे साहित्यिक कर्तृत्व अधोरेखित करणारा ‘ऐसी अक्षरे’चा विशेषांक म्हणजे केवळ स्मरणरंजन नाही, तर मराठी वाचकांची वाङ्मयीन दृष्टी जाणती करण्याचे आणि सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करण्याचे जे कार्य माडगूळकर बंधुंनी केले, त्या कर्तृत्वाला केलेले हे अभिवादन आहे. या विशेषांकातून गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकर या दोघांच्याही लेखकपणापलीकडचे काही पैलू वाचकांसमोर येतात. दोघांचे बालपण, संस्कार, भोवताल, त्यांचा काळ आणि त्यांचे अनुभवविश्व, या साऱ्यांचे दोघांनीही आपल्या स्वतंत्र प्रतिभेने सोने केले आणि सर्वार्थाने मराठी माती आणि साहित्याचे ऋण फेडले. गदिमांची गीतसृष्टी हे मराठी भावगीत परंपरेचे वैभव आहे. तर व्यंकटेशांचे लेखन हे अस्सल, जोमदार ग्रामीण जीवनाचे वास्तव आहे. चित्रमयता हे दोघांच्याही लेखनाचे वैशिष्ट्य आहे. या अंकाच्या निमित्ताने समग्र माडगूळकर पुन्हा पुन्हा वाचावेत, ही ओढ वाचकांना लागेल.’

समीर बेलवलकर यांनी प्रास्ताविक केले. सिद्धी कुलकर्णी यांनी आभार मानले.