पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेली प्रचंड गर्दी आणि त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्री आणि राजकीय नेत्यांचे पुणे दौरे, यामुळे बहुतेक पुणेकरांची शनिवार संध्याकाळ वाहतूक कोंडीत आणि परिणामी मनस्तापात गेली. मध्यवर्ती भागातील सर्व पेठा, डेक्कन जिमखाना आणि उपनगरांतील बाजारपेठांच्या भागांतील सर्व रस्त्यांवर वाहतुकीचा वेग गोगलगायीसारखा झाला होता.
शहराच्या मध्यवर्ती भागातील रविवार पेठ, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, विश्रामबाग वाडा, मंडई, नारायण पेठ, अप्पा बळवंत चौक, मोती चौक (पासोड्या विठोबा) या परिसरात दिवाळी साहित्य खरेदीसाठी सकाळपासून गर्दी झाली होती. खरेदीसाठीची झुंबड, रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला.
मंत्री, राजकीय नेत्यांचे दौरे
दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी झालेली असताना, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले आदी मंत्री; तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्या दौऱ्यांमुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडली. मंत्र्यांच्या वाहनांंचा ताफा जाण्यासाठी काही मार्गांवरील वाहतूक रोखण्यात आल्याने नागरिकांना दीर्घ काळ रस्त्यावर अडकून पडावे लागले.
चारचाकी वाहनांनी रस्ते व्यापले
खरेदी करण्यासाठी आलेले अनेक ग्राहक चारचाकी वाहनांतून आले होते. त्यांनी आपली वाहने गल्लीबोळांमध्ये उभी केल्याने अनेक ठिकाणी मूळ रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होते. मध्यवर्ती भागातील महापालिकेचे सर्व वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरल्याने अनेक वाहनचालकांनी आपल्या चारचाकी, दुचाकी नदीपात्रालगत उभ्या केल्या.
उपनगरांमध्येही गर्दी
लोहगाव, खराडी, हडपसर, वारजे, कोथरूड, कर्वेनगर, धनकवडी, कात्रज या ठिकाणच्या स्थानिक बाजारापेठांमध्येही गर्दी होती. पथारीवाले, हातगाडीचालकांच्या अतिक्रमणांमुळे उपनगरांमध्येही वाहतूककोंडी झाली होती.