पुणे : वन विभागाच्या कडबनवाडी गवताळ सफारी क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये फुलपाखरांच्या ४९ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये कॉमन ग्रास डार्ट, लाईनब्लूज, क्रिमसन टिप, कॉमन थ्री-रिंग आणि कॉमन फायव्ह-रिंग या गवताळ प्रदेशाशी निगडीत प्रजातींसह कोरड्या गवताळ प्रदेशातील आफ्रिकन बाबूल ब्लू आणि ब्राईट बाबूल ब्लू या प्रजातींचीही नोंद करण्यात आली. या सर्व प्रजाती गवताळ आणि शुष्क प्रदेशातील जैवविविधतेचे वैशिष्ट्य अधोरेखित करतात. लायसीनिडी (ब्लूज) या कुळातील प्रजाती सर्वाधिक नोंदल्या गेल्या असून पिएरीडी (व्हाईट्स आणि येलोज) या कुळातील प्रजाती त्यानंतरच्या क्रमांकावर होत्या.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र वन विभागाच्या पुणे विभागातर्फे कडबनवाडी गवताळ क्षेत्र तसेच शिर्सुफळ, कुंभारगाव आणि भिगवन परिसरात फुलपाखरांचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. फुलपाखरु संशोधक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे माजी सहाय्यक संचालक डॉ. राजू कसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण पार पडले. फुलपाखरू या विषयांवर चार पुस्तकांचे लेखन केलेल्या डाॅ. कसंबे यांनी गवताळ परिसंस्थेचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे.

या सर्वेक्षणामध्ये एकूण ४९ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली असून त्यामध्ये कॉमन ग्रास डार्ट, लाईनब्लूज, क्रिमसन टिप, कॉमन थ्री-रिंग आणि कॉमन फायव्ह-रिंग या गवताळ प्रदेशाशी निगडीत प्रजातींचा समावेश आहे. तसेच कोरड्या गवताळ प्रदेशातील आफ्रिकन बाबूल ब्लू आणि ब्राईट बाबूल ब्लू या प्रजातींचीही नोंद करण्यात आली. या सर्व प्रजाती गवताळ आणि शुष्क प्रदेशातील जैवविविधतेचे वैशिष्ट्य अधोरेखित करतात. लायसीनिडी (ब्लूज) या कुळातील प्रजाती सर्वाधिक नोंदल्या गेल्या असून पिएरीडी (व्हाईट्स आणि येलोज) या कुळातील प्रजाती त्यानंतरच्या क्रमांकावर होत्या.

‘हे सर्वेक्षण म्हणजे पुणे विभागातील गवताळ प्रदेशांतील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या व्यापक उपक्रमाचा पहिला टप्पा आहे. या अंतर्गत गवतांच्या प्रजाती, वृक्ष आणि झुडूप प्रजाती, पक्ष्यांच्या प्रजाती तसेच फुलपाखरांच्या प्रजातींची सविस्तर माहिती एकत्रित करण्यात येत आहे. इंदापूर, बारामती आणि सासवड वनपरिक्षेत्रातील गवताळ बहुल क्षेत्रात असलेल्या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पुन्हा सर्वेक्षण करून ऋतुजन्य प्रजातींमधील बदलांची नोंद घेण्यात येईल. संपूर्ण कार्य शास्त्रीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले जात आहे‘, अशी माहिती या उपक्रमाचे नेतृत्व करणारे पुणे क्षेत्राचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आणि उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. क्षेत्रीय नियोजन व अंमलबजावणी सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे आणि अतुल जैनक यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असून इंदापूर वनक्षेत्रपाल भाग्यश्री ठाकूर आणि त्यांचे सहकारी या कामात सक्रिय सहभागी आहेत.

गवताळ प्रदेश हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण परिसंस्था आहे. त्यातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास केल्याने दीर्घकालीन संवर्धन आणि शाश्वत निसर्ग पर्यटनाच्या नियोजनासाठी आधार मिळतो. – महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, वन विभाग, पुणे क्षेत्र