पुणे : ‘राज्यातील आमदार हे संवादापेक्षा एकमेकांना साताजन्माचे वैरी आणि सत्ताधारी विरोधकांना शत्रू मानत आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग होत आहे. संबंधित आमदारांवर कारवाई करावी,’ अशी मागणी शहरातील माजी खासदार आणि माजी आमदारांनी केली आहे. सध्याची राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान भवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, डॉ. कुमार सप्तर्षी, रामदास फुटाणे आणि ॲड. एल. टी. सावंत यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचा निषेध केला. यावेळी युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह राहुल डंबाळे उपस्थित होते. ‘विधिमंडळात जनहिताचे रक्षण करणे, जनताभिमुख धोरणे अमलात आणून राज्याचा विकास करणे ही कामे अपेक्षित आहेत. राज्यात गृहमंत्री आहेत का, असतील तर ते काय करत आहेत,’ असा सवाल करून या लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
‘विधिमंडळातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असतात. मात्र, आतासारखी परिस्थिती नव्हती. ‘पार्टी विथ डिफ्रन्स’सांगणारे जनतेच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार?’ अशा शब्दांत माजी खासदार वंदना चव्हाण यांनी टीका केली.
फुटाणे म्हणाले, ‘राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंसक प्रवृत्ती वाढली आहे. याला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे. विधिमंडळाच्या परिसरात घडलेल्या प्रकारानंतर गृहमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करून दोषी आमदारांचे निलंबन करणे अपेक्षित होते. मात्र, असे काही घडले नाही. भविष्यात यापेक्षा विचित्र परिस्थिती ओढावून घ्यायची नसेल आणि विधिमंडळाचे पावित्र्य टिकवून ठेवायचे असेल, तर तरुणांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.’
सप्तर्षी म्हणाले, ‘राज्यात जातीय द्वेष वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म शिकवणे ही काळाजी गरज निर्माण झाली आहे.’
‘आमदाराने आमदारासारखे वागणे अपेक्षित आहे. चांगले चारित्र्य, नीतिमत्ता असणाऱ्या लोकांची राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.’ असे सावंत म्हणाले.
‘चारित्र्यहीन राजकारण्यांना लोकांनी जागा दाखविण्याची वेळ आली आहे.’ असे ॲड. गायकवाड यांनी नमूद केले.
विधिमंडळाचे पावित्र्य भंग करणाऱ्या आमदारांना जागा दाखविण्यासाठी सुज्ञ मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा.’ असे शिवरकर म्हणाले.