Ganeshotsav 2025 : पुणे : अलीकडेच शालेय शिक्षणात पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्यावरून राज्यभर जोरदार चर्चा झाली होती. अशातच गोखलेनगर भागातील सुयोग मित्र मंडळाने ‘इंग्रजी माध्यमाला पायघड्या कशासाठी?’ हा देखावा सादर करून मातृभाषेतून शिक्षणाचा जागर केला आहे.

गोखलेनगर ही पानशेत पूरग्रस्तांची वसाहत सन १९६५मध्ये विकसित झाली. सुयोग मित्र मंडळातर्फे स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका सुवर्णमहोत्सवी वर्षापासून सुरू केली आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमालेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम वर्षभर राबवण्यात येतात.

या देखाव्यासाठी सुमीत दगडे, विश्वजित भवारी, साक्षांत शिर्सेकर, नील दगडे, साईराज बढे, सार्थक नेटके, अभिषेक पवार, सार्थक धुमाळ, सुयोग देखणे, ओमकार मापुसकर, संतोष चौधरी, समर्थ धुमाळ, अरॉन त्रिभुवन, देवेंद्र मिटकरी यांनी सजावट केली. मुकेश खामकर मंडळाचे अध्यक्ष असून, अक्षय माने, ऋषिकेश माने, मंगेश तडके, शुभम वाईकर, राजू मापुसकर हे मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. मंडळ यंदा ५१ वे वर्ष साजरे करीत आहे.

गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुयोग मित्र मंडळाने गणेशोत्सवातील देखाव्यातून मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व संशोधनाच्या साहाय्याने दाखवून देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी लष्करप्रमुख जनरल (नि.) मनोज नरवणे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, समाजसेवक बाबा आमटे यांच्यासारख्या अनेकांनी मातृभाषेतून शिक्षण घेऊन जागतिक कीर्ती मिळवल्याची उदाहरणेही या देखाव्यातून देण्यात आली आहेत.

मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी गेल्या दोन वर्षांत बंद पडलेल्या शेकडो शाळा, इंग्रजी माध्यमातील वाढलेले लाखो विद्यार्थी याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, जपान अशा विकसित देशांत मातृभाषेतूनच शालेय शिक्षण दिले जाते. इंग्रजी ही जगातील पहिल्या क्रमांकाची बोलली जाणारी प्रथम भाषा नाही. बंगाली, पंजाबी, मराठी, तेलुगू, तामीळ या भाषा पहिल्या वीस भाषांमध्ये समाविष्ट आहेत. भारतीय भाषा बोलणाऱ्यांची संख्या इंग्रजी भाषकांच्या दुपटीहून अधिक असल्याचेही संदर्भ देण्यात आले आहेत. इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यास हरकत नाही. मात्र, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत देण्याची भूमिका देखाव्यातून मांडण्यात आली आहे.

देखाव्याला संशोधनाची जोड

इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या शंभर विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. या प्रश्नावलीला मिळालेल्या प्रतिसादातून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रवेशाची कारणे, पाल्याची प्रगती समोर आली आहे. आर्थिक प्रगती होईल, फाडफाड इंग्रजी बोलता येईल, उच्च शिक्षण घेणे सोपे जाईल, प्रतिष्ठा वाढेल हे इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे पालकांचे उद्देश होते. प्रत्यक्षात, इंग्रजीतील शिक्षणामुळे इंग्रजी किंवा मातृभाषेवर प्रभुत्व नाही; तसेच ज्ञान, आकलन, उपयोजन, निर्मिती हे गुण विकसित झाले नाहीत. इतिहास, संस्कृती प्रभावीपणे शिकता आली नसल्याचे निष्कर्ष संशोधनातून समोर आले आहेत.