Ganesh Visarjan Pune Traffic Updates: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील प्रमुख दहा चौकांतील ध्वनिपातळीत यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाली. विसर्जन मिरवणूक मार्गावर सरासरी ९२.६ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवण्यात आली. त्यामुळे ध्वनिपातळीने नियमांचे उल्लंघन केले असले, तरी गेल्या काही वर्षांत यंदा ध्वनिपातळीत झालेली घट लक्षवेधी आहे. या पूर्वी २०१६मध्ये ९२.६ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली होती. ध्वनिक्षेपकांच्या तुलनेत पारंपरिक वाद्यांचे प्रमाण वाढल्याने ध्वनिपातळीत घट झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

मात्र, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविज्ञान विभागातर्फे शनिवार आणि रविवारी विसर्जन मिरवणूक मार्गावर ध्वनिपातळीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात प्रमुख दहा चौकांमध्ये वेगवेगळ्या वेळांना शास्त्रीय पद्धतीने ध्वनिपातळी नोंदवण्यात आली. विभागप्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मृणाल खुटेमाटे, सुमेध ब्राह्मणकर, आर्या घाडगे, अदिती तळोकार, श्रावणी शिंदे, क्रिश खोलिया, अथर्व राखोंडे, प्रथमेश पोधाडे, ओम सोनवणे, शंतनु केले, संचिता पाटील, ओम बेहरे, साहिल अग्रवाल, भूमिका अवचट, अदित्य संजीवी, कार्तिक गायखे, सुयोग सावंत, आदर्श चौधरी, उत्कर्षा काकड, अस्मिता गोगटे, स्वराली आवळकर, सि‌द्धार्थ शिडीद, वेदांत जोशी, मेहर रघाटाटे यांनी ध्वनिपातळीच्या नोंदी घेतल्या. मोहित कांडलकर, श्रेया कारंडे यांनी नियोजन केले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५, रात्री ७० डेसिबल, व्यापारी क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५, रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल इतकी ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर दहा प्रमुख चौकांत दुपारी १२ वाजता सरासरी ८८.५ डेसिबल, रात्री आठ वाजता ९८.७ डेसिबल, मध्यरात्री ९१.४ डेसिबल, तर सकाळी आठ वाजता १०१ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.

गेल्यावर्षी २०२४मध्ये ९४.८, २०२३मध्ये १०१.२, २०२२मध्ये १०५.२ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली होती. खंडूजीबाबा चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता नोंदवली गेलेली ६२.६ डेसिबल ही नीचांकी, तर रविवारी सकाळी आठ वाजता नोंदवलेली १०९ डेसिबल ही सर्वोच्च ध्वनिपातळी ठरली. विसर्जन मिरवणुकीत ध्वनिपातळीच्या नियमांचे उल्लंघन झाले असले, तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ध्वनिपातळीत घटही झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

प्रमुख दहा चौकांतील सरासरी ध्वनिपातळी

बेलबाग चौक – ९८.८

गणपती चौक – ९२.७

लिम्बराज चौक – ९३.४

कुंटे चौक – ९५.२

उंबऱ्या गणपती चौक – ९१.९

गोखले चौक – ९३.७

शेडगे विठोबा चौक – ९३.९

होळकर चौक – ९४.७

टिळक चौक – ८९.५

खंडोजी बाबा चौक – ८२.१

गणेश विसर्जन मिरवणुकी १० चौकातील सरासरी आवाजाची पातळी गेल्या काही वर्षीपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षात कार्यकर्ते आणि भाविक यांच्यात ध्वनीप्रदुषणाबाबत जागृती वाढली आहे. मिरवणुकीत अधिकाधिक पारंपरिक वा‌द्यांचा वापर करण्यात आला, रात्री डीजेवर नियंत्रण ठेवण्यात आले. चौकातील सर्व वेळातील आवाज तुलनेने कमी होता सकाळी आठ वाजता पुन्हा दणदणाट सुरु झाला

आवाजाच्या पातळी मोजण्याच्या प्रक्रियेब‌द्दल देखील उत्सुकता मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी या कामात स्वतःहून मदत केली. तसेच पोलीस, प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मंडळ व्यवस्थापक, भाविक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ध्वनिपातळी सर्वेक्षण साध्य झाले. एकूण गर्दी नियंत्रण आणि मापन नियोजनात पुणे मेट्रोचा लक्षणीय सहभाग होता. – डॉ. महेश शिंदीकर, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ