पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. हा आषाढी वारी पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ होतो. त्यामुळे पालखी मार्गांवरील आरोग्य सज्जतेचा आढावा आरोग्य विभागाकडून घेण्यात आला. आरोग्य यंत्रणांच्या तयारीसह औषधांची उपलब्धता आणि पालखी मार्गांवरील पाणी स्त्रोतांची तपासणी यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी नुकताच पालखी मार्गांवरील आरोग्य यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी पालखी मार्गांवरील आरोग्य संस्थांमधील पूर्वनियोजन, औषधांची उपलब्धता आणि स्वच्छता यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. याचबरोबर आरोग्य यंत्रणांना वारकऱ्यांवरील उपचारांच्या नियोजनासह इतर सूचना करण्यात आल्या. त्यात बेलसर आणि बिजवडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य पथकांद्वारे वारकऱ्यांच्या उपचारांचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. याचबरोबर पालखी मार्गांवरीवल टँकर भरणा केंद्रे आणि पाणी स्त्रोतांची तपासणी आणि हॉटेल व हॉटेलमधील कामगारांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

जेजुरीतील ग्रामीण रुग्णालयाला पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता विभागासह तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली. याचबरोबर आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यासोबत रुग्णवाहिकांचे योग्य नियोजन करण्यासही सांगण्यात आले. जळगाव कपमधील प्राथमिक आरोग्य पथकाला गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कऱ्हावागजमधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला लसीकरण करण्यास सांगण्यात आले आहे.

बारामती उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ अतिदक्षता विभाग सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. बारामतीमध्ये नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी नगरपालिकेशी संपर्क साधून नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. यवतमधील ग्रामीण रुग्णालयाला पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि तात्पुरते उपचार केंद्र सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. याचबरोबर विनापरवानगी गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

जेजुरी ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छता

जेजुरीतील ग्रामीण रुग्णालयाला डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी परिसरात अस्वच्छता आढळून आली. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. रुग्णालयाच्या आवारात तातडीने स्वच्छता करण्यास त्यांनी सांगितले. याचबरोबर परिचारिका सोनल पवार यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून पावले उचण्यात येत आहेत. पालखी मार्गांवरील स्वच्छतेसह वारकऱ्यांवरील उपचारांच्या सर्व सुविधांचे नियोजन आरोग्य विभागाकडून सुरू आहे. – डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य विभाग