पुणे : माल वाहतुकीच्या नावाखाली परराज्यातील गुटखा शहरात विक्रीस पाठविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडक पोलिसांनी महात्मा फुले पेठेतील लोहियानगर परिसरात कारवाई करुन दोन लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संतोष रामलखन रॉय (वय ३५, रा. नक्षत्र अंगण, लवासा रस्ता, पिरंगुट, ता. मुळशी) आणि विष्णू रामरतन गुप्ता (वय ३४, रा. शांताईनगर, मारुंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहियानगर येथील माल वाहतूकदाराच्या कार्यालयात हुबळीहून ट्रक आला असून, त्यात गुटखा असल्याची माहिती खबऱ्याने खडक पोलिसांना दिली. त्यानंतर रविवारी रात्री पोलिसांनी तेथे सापळा लावला. मालवाहतूकदाराच्या कार्यालयातून गुटखा घेण्यासाठी राॅय आणि गुप्ता आले होते. पोलिसांनी सापळा लावून राॅय आणि गुप्ता यांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी आठ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र कांबळे आणि पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक भरत बोराडे तपास करत आहेत.