जेजुरी : जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, मोरगाव आणि ३६ गावांना पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण १०० टक्के भरले. धरणातील स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून, ७० क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला झाला आहे.

मागील वर्षी जून महिन्यात नाझरे धरण कोरडे पडले होते. दर वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत धरणात पुरेसा पाणीसाठा होतो. मात्र, यंदा पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नाझरे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. या धरणाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून, त्यातील २०० दशलक्ष घनफूट मृत साठा मानला जातो. जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना आता पुरेसे पाणी उपलब्ध होणार असून, औद्योगिक वसाहतीमध्येही नाझरे धरण भरल्याने समाधानाचे वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

यंदा लवकर नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी कऱ्हा नदीत वेगाने येत आहे. या नदीपात्राच्या कडेला असलेल्या गावातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठा पाऊस आल्यास पाण्याचा वेग वाढू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नाझरे धरणाचे शाखा अभियंता अनिल घोडके आणि विश्वास पवार यांनी केले आहे.