पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या पथ विभागाच्या ‘मिसिंग लिंक’ उपक्रमात कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली आहे. मात्र, शहरातील महायुतीच्या इतर आमदारांना मिसिंग लिंकची कामे करून घेण्यास अपयश आले आहे.

मिसिंग लिंकची कामे करावीत, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या पाठपुराव्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघात तब्बल पावणे दोनशे कोटी रुपयांची कामे मार्गी लागली.

शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) रस्त्यांची आखणी करण्यात आली असून, काही रस्ते महापालिकेने विकसित केले आहेत. डीपीमध्ये ज्या खासगी जागांवर रस्त्याचे आरक्षण टाकले आहे, त्यांना आवश्यक तो मोबदला देऊन महापालिका जागा ताब्यात घेते. मात्र, शहरातील अनेक भागांत पुरेशा जागा ताब्यात न आल्याने या रस्त्यांची दुसऱ्या रस्त्यांशी जाेडणी झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे उघडकीस आले होते.

या पार्श्वभूमीवर, शहरातील विविध भागांतील एकूण ३० ‘मिसिंग लिंक’ प्राधान्याने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेणे, रस्ते तयार करणे यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांतील रस्त्यांचा यात समावेश आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून बैठका घेऊन कोथरूड मतदारसंघातील तीन मिसिंग लिंकची कामे पूर्ण करून घेण्यात बाजी मारली आहे.

कात्रज ते देहू बाह्यवळण मार्गाशेजारील सेवा रस्त्याला जाेडणाऱ्या एकलव्य महाविद्यालयाजवळील ‘मिसिंग लिंक’च्या कामासाठी आवश्यक असलेली दाेन गुंठे जागा नुकतीच महापालिकेच्या ताब्यात आली आहे. काेथरूड मतदारसंघातील महात्मा साेसायटीजवळील मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काेथरूड भागातील वाहनचालकांना महामार्गावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग मिळाला आहे.

सुतारवाडी येथेही एका ‘मिसिंग लिंक’चे काम लवकरच सुरू हाेणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच काढली जाणार आहे. तसेच कर्वे रस्ता ते पाैड रस्ता यांना जाेडणाऱ्या एका छाेट्या ‘मिसिंग लिंक’चे काम पूर्ण झाले असून, हा रस्ता दुचाकीसाठी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती पथ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ची कामे केली जात आहे. आतापर्यंत कोथरूड परिसरातील सर्वाधिक कामे मार्गी लागली आहेत. शहरातील इतर भागांतील मिसिंग लिंकची कामे निधी उपलब्ध झाल्यानंतर मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे – अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख