पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात बारावीचा निकाल ४३.६५ टक्के, दहावीचा निकाल ३६.४८ टक्के लागला.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी ही माहिती दिली. बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७४ हजार १३० विद्यार्थ्यांपैकी ७२ हजार २५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३१ हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचे १० हजार ९३, विज्ञान शाखेचे १७ हजार ६२८, वाणिज्य शाखेचे ३ हजार १२४, तर आयटीआयचे ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील ३६.१७, विज्ञान शाखेतील ६४.७८, वाणिज्य शाखेतील २०.७४, आयटीआयचे ३४.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या निकालात ११.१९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ३२.४६ टक्के लागला होता.
विभागीय मंडळनिहाय निकालात पुणे विभागातील ५ हजार ९४९, नागपूर विभागातील ३ हजार ६३६, छत्रपती संभाजीनगर विभागातील ३ हजार ३९६, मुंबई विभागातील ७ हजार २३४, कोल्हापूर विभागातील १ हजार ६१४, अमरावती विभागातील २ हजार ४, नाशिक विभागातील ४ हजार ५३७, लातूर विभागातील ३ हजार १८१, तर कोकण विभागातील १२५ विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
दहावीच्या परीक्षेसाठी ३८ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ३७ हजार ५७६ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.३० टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ३६.७८ टक्के लागला होता. विभागीय मंडळनिहाय निकालानुसार पुणे विभागातील १ हजार ९०९, नागपूर विभागातील २ हजार १८, छत्रपती संभाजीनगर विभागातील २ हजार १६२, मुंबई विभागातील १ हजार ७९२, कोल्हापूर विभागातील ४९६, अमरावती विभागातील १ हजार ११९, नाशिक विभागातील २ हजार ८६३, लातूर विभागातील १ हजार ३०८, तर कोकण विभागातील ५२ विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.