पिंपरी : दुसऱ्या व्यक्तीबरोबर अश्लील छायाचित्र दिसल्याने लॉजमध्ये चाकूने वीर करून प्रेयसीचा खून केल्याची घटना वाकड परिसरात शनिवारी घडली. खून केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना माहिती दिली.

दिलावर सिंग (वय २५, रा. पिसोळी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने देहूरोड परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय प्रेयसीचा खून केला आहे.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. दिलावर यांचे २६ वर्षीय तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु, तरूणी विश्वासघात करून दुसऱ्याबरोबर संबंध ठेवत आहे, असा त्याला संशय होता. त्यामुळे त्याने तरुणीला वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळाखडक परिसरातील एका लाॅजवर दुपारी नेले. तिचा मोबाईल फोन तपासला. त्यात तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर अश्लील छायाचित्र दिसले. याचा दिलावर याला राग आला. या रागातून त्याने चाकूने वार केले त्यामध्ये ती मरण पावली.

खुनानंतर आरोपी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गेला. प्रेयसीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. कोंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याबाबत दूरध्वनीद्वारे पिंपरी-चिंचवड पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर तरुणीचा मृतदेह आढळून आला.