रांगेत न थांबता तिकीट मिळविण्याची सुविधा

पुणे : तिकिटासाठी रांगेत न थांबता घरबसल्या तिकीट मिळविण्याची सुविधा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी महामेट्रोकडून ‘पुणे मेट्रो’ अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मेट्रो स्थानकापासून असलेल्या पर्यायी वाहतूक सेवेची (फिडर सेवा) माहिती मिळण्याबरोबरच मेट्रोचे वेळापत्रकही उपलब्ध होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १२ किलोमीटर लांबीची मेट्रो प्रवासी सेवा सहा मार्चपासून सुरू झाली आहे. प्रवासी सेवेला प्रारंभ झाल्यापासून प्रवाशांचा मेट्रोला मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. मेट्रो प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी महामेट्रोकडून विविध उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्याअंतर्गत सहज तिकीट उपलब्ध व्हावे, प्रवाशांना रांगेत थांबावे लागू नये, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे मेट्रो अ‍ॅपच्या माध्यमातून एका वेळी जास्तीत जास्त दहा तिकिटांची खरेदी प्रवाशांना करता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांना हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून मोबाइलमध्ये कार्यान्वित करावा लागणार आहे. वैयक्तिक माहितीसाठी अन्य आवश्यक नोंदी केल्यानंतर तिकीट उपलब्ध होणार आहे. स्थानकांची माहिती, स्थानकाच्या परिसरातील पर्यायी वाहतूक सेवा, विजेवर धावणाऱ्या मोटारी, तीनचाकी आणि दुचाकी सेवेची माहिती, सायकल सेवा, पीएमपी, वाहनतळ यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा अ‍ॅप प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट घेतल्यानंतर रांगेत उभे राहण्याचा वेळही वाचणार आहे. मेट्रो प्रवासासाठी तिकीट काढायचे झाल्यास अ‍ॅपचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने तिकिटासाठीचे पैसे जमा करावे लागतील. पैसे जमा झाल्यानंतर मोबाइलवर डिजिटल तिकीट येईल. ते प्रवासात दाखवता येईल. एकेरी तसेच परतीच्या मार्गावरील तिकीटही या सुविधेत काढता येणार आहे.