पुणे : पुणे मेट्रोचे रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले असून, आता या मार्गाच्या उद्घाटनाचा तिढा निर्माण झाला आहे. या मार्गाला केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी काही अटींसह परवानगी दिली आहे. याच वेळी या मार्गाच्या उद्घाटनासाठी महामेट्रोने पाठविलेल्या प्रस्तावावर राज्य सरकारनेही अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा मार्ग सुरू करण्यावरून महामेट्रोची कोंडी झाली आहे.
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी १९ ते २१ जानेवारी या कालावधीत केली होती. या तपासणीदरम्यान त्यांनी या मार्गातील काही त्रुटी उपस्थित केल्या होत्या. त्या दूर करून महामेट्रोने त्याचा अहवाल आयुक्तांना पाठविल्यानंतर या मार्गाला अंतिम परवानगी मिळण्याचा मार्ग खुला झाला होता. मात्र, आता आयुक्तांनी या मार्गाला काही अटींसह परवानगी दिली आहे. या मार्गातील काही त्रुटी आयुक्तांनी नव्याने मांडल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा…तापमानातील चढ-उतारामुळे आरोग्याला धोका! आरोग्यतज्ज्ञ सांगताहेत कशी काळजी घ्यावी…
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मोदींचा दौरा लांबणीवर पडल्याने ते होऊ शकले नाही. आता मेट्रो मार्ग सुरू करण्यास अद्याप अंतिम परवानगी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. याच वेळी महामेट्रोने हा मार्ग सुरू करण्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावावर राज्य सरकारनेही अजून निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील सेवा सुरू करण्याचा मुहूर्त दिवसेंदिवस लाबंणीवर पडत आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
मेट्रोची विस्तारित सेवा गेल्या वर्षी १ ऑगस्टला सुरू झाली. वनाज ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी या मार्गावर वनाज ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला. आता वनाज ते रुबी हॉल मार्ग रामवाडीपर्यंत विस्तारण्यात आला आहे. या विस्तारित मार्गावर अद्याप सेवा सुरू झालेली नाही.
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी काही अटींसह परवानगी दिली आहे. त्यांनी काढलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर या मार्गाच्या उद्घाटनाबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग
अंतर – ५.५ किलोमीटर
स्थानके – बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी