पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील मेट्रोला तंबाखूजन्य पदार्थांचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. अवघ्या आठवडाभरात (२२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत) मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर सर्वाधिक १२.४६ किलो सुट्टी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुटख्याच्या ९८६ पुड्या, तर १३२५ लाइटर आणि माचिस या वस्तू आढळून आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, बेशिस्त प्रवाशांना वारंवार आव्हान करूनही स्थानकांंच्या भिंती, सरकते जिने, बाहेरील भिंती रंगवून ठेवल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्वच्छ, सुलभ आणि आरामदायी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनपुढे (महामेट्रो) नवीन आव्हान पुढे उभे राहिले आहे.
पुण्यातील पीसीएमसी ते स्वारगेट (पर्पल लाईन) या मार्गावर आणि वनाज ते रामवाडी (ब्ल्यू लाईन) या मार्गावरील मेट्रो प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. आरामदायी आणि सुकर प्रवास होत असून महामेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही बेशिस्त प्रवाशांमुळे सुंदर, स्वच्छ मेट्रोची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच मेट्रो, रेल्वेमध्ये ज्वलनशील पदार्थांची वाहतूक तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वर्ज्य आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही हे पदार्थ हानिकारक असताना, अनेक प्रवाशांकडून मेट्रो स्थानकांवर, सरकत्या जिन्यांवर पान, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन भिंती, परिसर अस्वच्छ करण्याचे प्रकार केले जात आहेत.
त्यामुळे इतर प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या वर्तनाबरोबर मेट्रोच्या सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तंबाखूजन्य वस्तू सार्वजनिक ठिकाणी टाकणे ही अस्वच्छतेकडे वाटचाल अधोरेखित करत असून महामेट्रोपुढे अशा बेशिस्तांना रोखणे ही चिंतेची बाब ठरत आहे. पुणे मेट्रोच्या लाइन १ आणि लाइन २ या दोन मार्गांवरील विविध स्थानकांवरून सर्वाधिक १२.४६ किलो सुट्टी तंबाखू प्रवाशांकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये वनाज ते रामवाडी या मार्गावर अधिक ८.७३ किलो तंबाखूजन्य वस्तू सापडल्या असून मेट्रो स्थानकांवर सरकत्या जिन्यांवर पिचकाऱ्या मारणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची मागणी इतर प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी सेवा देण्यासाठी महामेट्रोकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, तरी काही प्रवाशांकडून तंबाखूजन्य आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक केली जात असल्याने प्रवेशद्वारावरील तपासणीदरम्यानच समोर आले आहे, तर काही प्रवाशांकडून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून मेट्रो परिसरात अस्वच्छता पसरविण्याचे कृत्य केले जात आहे. असे प्रवासी आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रवाशांनी असे गैरप्रकार टाळावेत. – चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महासंचालक, जनसंपर्क आणि प्रशासन, महामेट्रो, पुणे
जप्त करण्यात आलेले तंबाखूजन्य पदार्थ
वस्तू – नग
गुटखा – ९८६ पुड्या
लाइटर,माचिस – १,३२५
चुना डब्बी, बटवा – ९०९
सुट्टी तंबाखू – १२.४६ किलो