पुणे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे ३०३ शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये अद्ययावत भौतिक सुविधांसह परदेशी भाषांचेही धडे दिले जाणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे या वेळी उपस्थित होते. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या धर्तीवर सर्व सुविधा जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलअंतर्गत ३०३ शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात सुसज्ज वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक ग्रंथालय, स्वच्छतागृह, संरक्षण भिंत, सौर ऊर्जा प्रकल्प, डिजिटल बोर्ड अशा सुविधांचा समावेश आहे. तसेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर विशेष भर दिला जाणार आहे. सामान्य ज्ञान परीक्षा आणि इस्रो भेट, शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पुणे मॉडेल स्कूल उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबत कायापालट होणार आहे. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
उपक्रमाला शनिवारी सुरुवात
पुणे जिल्हा परिषदेच्या पुणे माॅडेल स्कूल या उपक्रमाला येत्या शनिवारी (१४ जून) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.